Saturday, August 29, 2020

अपरिचित पेशवेकालीन शाडूची गणेशमूर्ती

गणेशोत्सवाचे आणि पुण्याचे नाते अतूट आहे. पुण्यात शोध घेतला तर अक्षरशः शेकडो वैशिष्ट्यपूर्ण गणपती बघायला आणि उत्सवासंबंधी शेकडो किस्से, आठवणी ऐकायला मिळतात. जसा गणेशोत्सव आज साजरा केला जातो तसा तो पेशवाईत देखील शनिवारवाड्यात साजरा केला जात असे. पेशवे हे गणेशभक्त होते. पेशवाईच्या अखेरीस पुण्यात चारशेहून अधिक मंदिरे होती, त्यात चवथ्या क्रमांकावर गणपतीची देवळे होती. आज आपण असाच एक अपरिचित गणपती बाप्पा बघणार आहोत. 

पुण्यातील प्रसिद्ध अशा लक्ष्मी रस्त्यावर गणपती चौक आहे. तिथून सरळ पुढे गेल्यावर डावीकडे हॉटेल अगत्य दिसते. या हॉटेल समोरील एका इमारतीत राहणाऱ्या दातार यांच्याकडे एक विशेष गणेशमूर्ती आहे. दरवर्षी शनिवारवाड्यात गणेश उत्सवात मूर्ती तयार करून देणारा शिल्पकार एकेवर्षी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यावेळेस दातारांकडील एक व्यक्ती मूर्ती बनविण्यात कुशल होती. त्यांचे नाव त्यावेळी कोणीतरी सुचविले. तेव्हा दातारांच्या घराण्यातील शिल्पकाराने मूर्ती इतकी सुंदर बनवली की पेशव्यांनी दातारांकडेच दरवर्षी उत्सव मूर्ती बनविण्याचे काम सोपविले.

दातारांकडील पेशवेकालीन गणेशमूर्ती

गणेशमूर्ती चतुर्भुज म्हणजे चार हातांची आहे. मागील दोन हात शस्त्रं किंवा कमलपुष्प यांसाठी आहेत. तसेच खालील उजवा हात आशीर्वाद देत असून डावा हात मोदकासाठी आहे. साधारण दोन फूट असलेली ही भरीव मूर्ती वजनाने जड आहे. डाव्या सोंडेच्या या आसनस्थ बैठ्या मूर्तीस अंगभूत मुकुट आहे. अतिशय सुरेख असलेली ही मूर्ती शाडू मातीची आहे. पेशवाईत गणेशमूर्ती कोणत्या सालापासून दातारांकडून देण्यात येऊ लागली त्याबाबत मात्र माहिती मिळत नाही. सदर मूर्ती दोनशेहून अधिक वर्षे जुनी म्हणजेच पेशवेकालीन असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शनिवारवाड्यात गणेशोत्सवासाठी जशी मूर्ती दातारांकडून जायची तशीच ही गजाननाची मूर्ती असल्याचे कळते. दातार कुटुंबीयांनी अद्यापही ही पेशवेकालीन मूर्ती व्यवस्थितरीत्या जतन करून ठेवली आहे. 

दातारांच्या छोट्या घरात मूर्ती नेण्याकरिता श्रीमंत पेशवे स्वतः लवाजम्याने आले होते. तेव्हा घराची चौकट पेशव्यांच्या पागोट्याला लागली. तेव्हा श्रीमंतांनी कारभाऱ्याला दातार यांना नवीन घर बांधून देण्यास सांगितले. अशी आख्यायिका या घराण्यात सांगण्यात येते. येथील इमारतीच्या जागेवर पूर्वी दातारांचा वाडा होता.

२०२० सालच्या गणेशोत्सवातील सजावट

१९०१ साली मानाचे चवथे तुळशीबाग गणपती मंडळ स्थापले गेले. मंडळाच्या स्थापनेत दातार यांच्या घराण्यातील कॉन्ट्रॅक्टर असलेल्या एका व्यक्तीचा समावेश होता. तसेच लक्ष्मी रस्त्यावरील एक प्रसिद्ध वास्तू म्हणजे 'काकाकुवा मॅन्शन'. कधीकाळी गजबजून जाणारी ही वास्तू दातार घराण्यातील एका व्यक्तीने बांधली आहे. असे सांगितले जाते की ज्यांनी ही वास्तू बांधली त्यांच्याकडे एक काकाकुवा पक्षी होता. म्हणून या वास्तूस 'काकाकुवा मॅन्शन' असे नाव ठेवण्यात आले.
-----------------------------------------------------------------------------
संदर्भ - दातार कुलवृत्तांत
-----------------------------------------------------------------------------
© सुप्रसाद पुराणिक
-----------------------------------------------------------------------------
पुण्याचा गणेशोत्सव घरबसल्या अनुभवायचाय ?
मग यावर्षी नक्की वाचा पुण्यातल्या बाप्पांवरील पुस्तक "पुण्याचे सुखकर्ता"
आजच आपली प्रत बुक करा
संपर्क :
स्वप्नील नहार - 9075551530
सुप्रसाद पुराणिक - 9552688751

1 comment: