Thursday, March 4, 2021

पुण्याचा इतिहासातील गणेशोत्सव

गणेशोत्सवाची पाळंमुळं पुणे शहरात रुजलेली आहेत. गणेशोत्सव अनुभवावा तो फक्त पुण्यात. पेशवाईत पुण्यात चारशेहून अधिक मंदिरे पुण्यात होती, त्यात चवथ्या क्रमांकावर गणपतीची देवळे होती. जसा गणेशोत्सव आत्ता साजरा केला जातो तसा तो पेशवाईत देखील पुण्यात साजरा केला जात असे. तसं पाहिलं तर शिवपूर्वकाळापासून गणेशोत्सव साजरा होत असे. पेशवाईत गणेशोत्सवाबरोबर दसरा, होळी, वसंत पंचमी, मकर संक्रांत असे सण प्रामुख्याने साजरे होत असे. ते अतिशय दिमाखात व धुमधडाक्यात साजरे करण्यात येत. या शाही सणांसाठी पेशवे दरबारातून म्हणजे सरकारमधून भरीव रक्कम अदा करण्यात येत असे.

पेशव्यांचे आद्यदैवत म्हणजे 'श्री गणेश'. पेशवे मूळचे कोकणातल्या श्रीवर्धनचे. बाळाजी विश्वनाथ पेशवे ब्रह्मेंद्रस्वामींचे भक्त होते. त्यांनी बाळाजी विश्वनाथांना भेटीदरम्यान 'श्रीगजानन व भार्गव तुला महत्पद देईल' असा आशीर्वाद दिला होता. स्वामींच्या म्हणण्यानुसार गणरायाचा आशीर्वाद बाळाजी विश्वनाथांना पुढच्या काळात राजकीय प्रतिष्ठा लाभून मिळाला असे दिसते.

गणपतीचे जुने चित्र (संदर्भ - इंटरनेट)

बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे शनिवारवाड्यात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करू लागले.  त्यांच्या नंतरचे पेशवे म्हणजेच थोरले माधवराव हे तर मोठे गणेशभक्त होते. सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात ते लहान असताना पुरंदर किल्ल्यावर गणेशोत्सव साजरा झाल्याची नोंद मिळते. शिवाय पुण्याजवळील औंध या गावी सुद्धा १७३२ मध्ये गणेशोत्सव साजरा होत असे. इतकेच नव्हे, त्याकाळी मिरवणुकीत मानाचा क्रम देखील ठरला होता, अशा नोंदी सापडतात. शनिवारवाड्यात भाद्रपद महिन्यातील प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत गणेशोत्सव चालत असे. त्यानिमित्ताने वाड्यातील गणपती रंगमहाल विशेष सजविला जाई. संगीतबारी, नृत्य, सोंगे, दशावतारी खेळ, कथाकथन आणि इतर करमणुकीचे प्रकार या महालात पेशव्यांच्या उपस्थितीत सादर केले जाई. या सर्वांना योग्य ती बिदागी दिली जाई. येथील गणपती समोरील आरास, चित्रांच्या तसबिरी, आरसे आणि अन्य शोभेच्या वस्तू यांमुळे गणेश महालाला वेगळे रूप प्राप्त होई.


गणपती उत्सवात राजवाड्यातील सर्व नोकरदार वर्ग झटत असे आणि त्यांच्यामुळे गणेशोत्सव यशस्वीरीत्या पार पडत असे. म्हणून पेशवे त्यांना गोडधोड फराळासह काही रक्कम बक्षिसादाखल देत असत. ब्राह्मणांच्या पंगती उठत. दहाव्या दिवशी फुलांनी सजविलेल्या पालखीत शाडूची रंगवलेली गणेश मूर्ती वाजतगाजत नदीवर नेण्यात येत असे. नदीवर नेल्यावर तिथे पूजा, धुपारती वगैरे धार्मिक संस्कार झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात येई. पेशवे या मिरवणुकीबरोबर स्वतः जात असत. हरिपंत फडके, मुजुमदार, त्रिंबकराव दीक्षित, चिंतामण दीक्षित, अप्पा बळवंत, आबा खाडिलकर, शिवाजी गोणत, बाजीपंत अप्पा, सकोपंत दबडघाव ही गणेशोत्सवातील पुण्यातील प्रतिष्ठित घरे होती.

गणपतीचे जुने चित्र (संदर्भ - इंटरनेट)


नानासाहेब पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव आणखी थाटामाटात साजरा होत गेला असे खर्चाच्या नोंदींवरून दिसते. सवाई माधवरावांच्या काळात इ. स. १७९४-९५ मध्ये गणेशोत्सवात साजरा झाला. उत्सवाच्या खर्चाच्या नोंदी सवाई माधवरावांच्या वाड डायरीमध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा अनेक कलाकारांना बिदागी देण्यात आली होती. तेव्हा कलाकारांमध्ये १८१ गोसावी हरदास यांना २१५५ रुपये, ३९ गायकांना ३२९ रुपये, ४३ नृत्यांगनांना १७२६ रुपये बक्षिसी व ३३ गुरव पखवाजींचा १४८ रुपये तसेच वाजंत्री वाजविणाऱ्यांना २४० रुपये समावेश झाला होता. अशा अनेक जणांना एकूण ४१७५ रुपये देण्यात आले होते. शनिवारवाड्यात गणेश रंगमहाल सवाई माधवराव यांच्या कारकिर्दीत बांधला असे दिसते.

शनिवारवाड्याला एकूण ५ प्रवेशद्वारे होती, त्यातील एकाचे नाव 'गणेश दरवाजा' असे आहे. त्याचे कारण म्हणजे दरवाजाबाहेर आपल्याला जे गणपती मंदिर दिसते, त्यावरून दरवाजाचे नाव पडले असावे. तो गणपती आज 'श्रीमंत पेशवे गणपती' म्हणून ओळखला जातो. शनिवारवाड्यासमोर जे बटाट्या मारुती मंदिर आहे, त्या मारुतीच्या दोन्ही बाजूस गणपती बघायला मिळतात. शिवाय दिल्ली दरवाजातून आपण शनिवारवाड्यात शिरलो की आजही समोर भिंतीवर वरच्या बाजूस जुने गणपतीचे चित्र पाहायला मिळते. तसेच पेशवेकालीन गणेशोत्सवाचे १७९२ चे चित्र जेम्स वेल्स याने काढलेले होते, असे कळते. पेशवाईनंतरही गणेश उत्सव साजरा होतच राहिला.

---------------------------------------------------------------------------------

"पुण्याचे सुखकर्ता" पुस्तक

पुण्यातील ऐतिहासिक सार्वजनिक गणेशोत्सवासंबंधी जाणून घ्यायचंय ? मानाचे ५ गणपती, प्रसिद्ध गणेशमूर्ती, गणपती मंडळे व उत्सवासंबंधी रंजक किस्से वाचायचे असतील तर पुण्याचे सुखकर्ता नक्की खरेदी करून वाचा.

Flipkart Link - पुण्याचे सुखकर्ता

http://dl.flipkart.com/dl/punyache-sukhkarta/p/itm35ff3dba5cabe?pid=9789388550147&cmpid=product.share.pp

(हे पुस्तक SahyadriBooks, Amazon, Bookganga येथे ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे.)

---------------------------------------------------------------------------------

संदर्भ :
पेशवेकालीन पुणे - द. ब. पारसनीस
वाड डायरीज, सवाई माधवराव पेशवे भाग ४
---------------------------------------------------------------------------------

2 comments: