Friday, February 28, 2020

नावामागे दडलयं काय ?? - " स्वारगेट "

पुण्यात राहून स्वारगेट माहित नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. पुण्यातल्या पुण्यात कुठे जायचे असेल किंवा पुण्याबाहेर जायचे असेल तर हे ठिकाण टाळणं अशक्यच. खर तर स्वारगेटला पुण्याचे दळणवळणाचे केंद्रस्थान म्हटले पाहिजे. जसे हे ठिकाण आज महत्वाचे आहे तसेच ते पूर्वीही महत्वाचे होते. मुख्य गावापासून लांब असणारा हा परिसर होता. सध्याचे स्वारगेट भरवस्तीतच गणले जाते. त्यावेळेस स्वारगेटला काय होते ? हे नाव कसे पडले ? आज बघू "स्वारगेट" या नावामागे दडलयं काय...

पुण्यात प्रवेश करण्यासाठीचा एक पर्यायी मार्ग येथून जात असे. पुण्याची वस्ती वाढत होती, पेठा वसत होत्या. रस्ते बनत होते. त्यामुळे पूर्वी गावाबाहेर संरक्षणासाठी गस्त ठेवली जात असे. त्यासाठी घोडेस्वार तैनात असत. अशा ठिकाणांना नाक्याचे ठिकाण किंवा पहाऱ्याच्या चौक्या म्हणत असत. अशी ही महत्वपूर्ण ठिकाणं इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली. कारण त्या ठिकाणांचे महत्व तसेच राहिले होते. इंग्रज अमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव 'गेट' असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे "स्वारगेट" असे ओळखले जाऊ लागले. आजतागायत ते नाव तसेच राहिले आहे.


स्वारगेट चौक     Image Source - Google

इ.स.१६६० साली शायिस्तेखान पुण्यात आला, तेव्हा त्याने कात्रज घाट उतरल्यावर पहिली मोठी गस्तीची चौकी स्वारगेट परिसरात उभारली होती. मोठ्या फौजफाट्यासह त्याने पुण्यात तळ ठोकला होता. पुढे सातारा ही राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी वसवली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे. त्यामुळे या मोक्याच्या जागेवर पेशवाईत या चौकीचा उपयोग तपासणीसाठी, जकात वसूल करण्यासाठी सुद्धा होत असे. स्वारगेट सोडून रामोशीगेट, म्हसोबागेट, पेरूगेट, क्वार्टर गेट, पुलगेट ही गेट आजही पुण्यात अस्तित्वात आहेत. पैकी रामोशीगेट येथे चौक्यांवर पहारेकरी म्हणून रामोशी समाजातील लोकांची नेमणूक केली जायची. त्यावरून तिथल्या जागेला 'रामोशीगेट' असे नाव मिळाले.

२ एप्रिल १९४१ मध्ये सिल्व्हर ज्युबिली कंपनीकडून पुण्यात बस धावू लागल्या. सुरवातीला लहान आकाराच्या बस होत्या. त्यात फक्त १४ प्रवासी बसत. बससेवेला टांगेवाल्यांनी विरोध केल्याचे समजते. कारण आधीपासूनच घोडे हेच प्रवासाचे मुख्य वाहन होते. नंतर रिक्षा सुरु झाल्या. सायकलही आधीपासून अस्तित्वात होत्याच. सायकलींचे शहर म्हणूनही पुण्यास म्हणत असत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मोटरसायकल आल्या. सन १९४८ मध्ये पुणे ते अहमदनगर दरम्यान पहिली एस. टी. धावली. स्वारगेट परिसराने दळणवळण करणारी सर्व साधने अनुभवली. आणि आता मेट्रो येथून धावणार आहे. त्याच्याआधी पुण्यात टांगे अस्तित्वात होते. आज हा परिसर स्वारगेट नावाने ओळखला जातो तरी येथील बसस्थानकाचे नाव 'छत्रपती राजर्षि शाहू महाराज बसस्थानक' असे आहे. स्वारगेट चौकाचे नाव 'देशभक्त केशवराव जेधे चौक' असे आहे. त्यांचा पूर्णाकृती पुतळ्यासह त्यांचा संक्षिप्त जीवनपट येथे लावला आहे. चौकातून गेलेल्या उड्डाणपुलास सुद्धा त्यांचेच नाव आहे. तरीही तो स्वारगेट चौक या पुण्यातल्या इतर ठिकाणांप्रमाणे जुन्या नावानेच ओळखला जातो. पण दुर्दैवाने आपल्याकडून अशा गोष्टी बघितल्या सुद्धा जात नाहीत. जुने नाव टिकले चांगली गोष्ट आहे पण निदान अशा गोष्टी आपल्याला माहित तरी पाहिजे. 

चौकातील केशवराव जेधे पुतळा

पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे काम चालू झाले आहे. त्यात 'पिंपरी चिंचवड ते स्वारगेट' हा मार्ग पुणे मेट्रोच्या तीन मुख्य कॉरिडॉर पैकी एक कॉरिडॉर असणार आहे. 'पुणे मेट्रो स्वारगेट मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब' लवकरच येथे उभे राहणार असल्याचे कळते. हे देशातले पहिलेवहिले 
मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब असणार आहे. मध्यंतरी स्वारगेटजवळ भुयारी मेट्रोचे काम चालू असताना २ भुयारी मार्ग सापडले. स्वारगेट ते सारसबाग या रस्त्यावर इ.स. १९१५ मध्ये स्वारगेट जलकेंद्र होते. सुमारे शंभरवर्षांपूर्वी पाण्याच्या व्यवस्थेसाठी ही भुयारं बांधली असतील.

स्वारगेटचे महत्व बसस्थानक आणि एस.टी. स्टॅन्डमुळे सध्याच्या काळात वाढलेले दिसते. कधिकाळचा गावाबाहेर असणाऱ्या या परिसराने आज संपूर्ण शहराला जोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक रस्ता, शंकरशेठ रस्ता, पुणे-सातारा रस्ता व नेहरू स्टेडियमहून जोडणारा थोरले बाजीराव रस्ता असे महत्वाचे रस्ते स्वारगेटला येऊन मिळतात. पूर्वीचे स्वारगेटचे महत्व, तिथला दरारा आता संपला आहे. ना घोडेस्वारांचे ठाणे उरले, ना पहारेकरांच्या चौक्या. एका बाजूला चौकात छोटी पोलीस चौकी आहे. ती रहदारीच्या, गजबजलेल्या या भागाचा भार सांभाळत उभी आहे. स्वारांचा पहारा किंवा गेट या जागेवर पूर्वी होते त्यामुळे नाव ''स्वारगेट'' पडले, हा इतिहास विस्मृतीत जाऊ नये म्हणून हा ब्लॉगमार्फत केलेला छोटासा प्रयत्न.


१९५७ सालचे स्वारगेट बसस्थानकाचे छायाचित्र     Image Source - Google
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ - 
१) हरवलेले पुणे - डॉ. अविनाश सोवनी
२) आधीच पुणे गुलजार - वि. ना. नातू
३) जुने पुणे आणि जुने वक्ते - दि. म. देशपांडे 
-------------------------------------------------------------------------------

14 comments: