Friday, March 13, 2020

क्रिकेटविश्वाचे ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ संग्रहालय

क्रिकेट विश्वचषकाचा माहोल सध्या जगभरात आहे. क्रिकेट म्हणजे तुम्हा आम्हा भारतीयांचा जीव की प्राण! अशा क्रिकेटरसिकांसाठी पुण्यातील सहकारनगरमध्ये एक अनोखे संग्रहालय आहे. 'ब्लेड्स ऑफ ग्लोरी' असे नाव असलेले हे भारतातले पहिले क्रिकेट संग्रहालय. क्रिकेटप्रेमी रोहन पाटे यांच्या कल्पकतेतून व अथक परिश्रमाने हा क्रिकेटचा खजिना संग्रहालयाच्या रूपात आपणा सर्वांसाठी निर्माण झाला आहे. ते स्वतः उत्तम क्रिकेटपटू असून क्रिकेट क्षेत्रातील ओळखीतून व जपलेल्या संबंधातून हे संग्रहालय उभे राहिले आहे. क्रिकेटच्या प्रेमापोटी त्यांनी देशोदेशी प्रवास केला. २ मे २०१२ मध्ये क्रिकेटचा 'देव' समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या हस्ते उदघाटन झालेल्या या संग्रहालयाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने घेतलेली आहे. जगातील सर्वात मोठ्या या क्रिकेट संगहालयात फक्त भारतातील नव्हे तर जगभरातील नामवंत क्रिकेटपटूंच्या आठवणी येथे वस्तूंच्या रुपात येथे बघायला मिळतात.

क्रिकेट या खेळाला सुद्धा स्वतःचा असा इतिहास आहे. चार हजार स्क्वेअर फूट असलेल्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारात गेल्या तीन शतकात क्रिकेट बॅटमध्ये झालेला बदल पहायला मिळतो. संग्रहालयाचा अँबियन्स आपला उत्साह व्दिगुणित करून टाकतो. संग्रहालयाचा एक माणूस आपल्याला संग्रहालय दाखवतो. भारताने १९८३ व २०११ मध्ये जिंकलेल्या संघांचे विश्वकरंडकासह फोटो व स्वाक्षऱ्या केलेल्या बॅट पाहायला मिळतात. त्यामुळे परत एकदा त्या जुन्या आठवणींमध्ये मन रमते. सन १९७ पासून वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भारतीय संघाच्या सही केलेल्या बॅट्स पहायला मिळतात. शिवाय आत्तापर्यंत विश्वचषक जिंकलेल्या संघांच्या स्वाक्षऱ्या असणाऱ्या बॅट्स बघायला मिळतात.


‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ संग्रहालय       Image Source - Internet

उदघाटनसमयी सचिन तेंडुलकर  रोहन पाटे      Image Source - Internet

सर डॉन ब्रॅडमन यांची सिडनी येथील संग्रहालयात गोल्डन बॅट आहे, त्याची प्रतिकृती येथे पहायला मिळते. त्याशिवाय त्यांची मूळ स्वाक्षरी केलेली अजून एक बॅट इथे पाहायला मिळते. कसोटीत व एकदिवसीय प्रकारात दहा हजार धावा बनविलेल्या खेळाडूंच्या बॅट्स सह्यांसह पाहायला मिळतात. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, रिकी पॉन्टिंग, सनथ जयसूर्या, ख्रिस गेल या ख्यातनाम खेळाडूंचा समावेश असून त्यांच्या कामगिरीची येथे आठवण होते. कसोटीत त्रिशतक केलेल्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेल्या बॅट्स पहायला मिळतात. ज्यात ब्रायन लारा, हाशिम अम्ला, वीरेंद्र सेहवाग, सनथ जयसूर्या, कुमार संगकारा यांचा समावेश आहे. सध्याचा भारताचा कर्णधार ''रनमशीन'' विराट कोहलीचेही इथे एका स्वतंत्र भिंतीवर स्कोअरबोर्ड म्हणजे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड बघायला मिळतेशिवाय त्याची जर्सी, बॅट, पॅड्स, ग्लोव्हस आणि छायाचित्रे प्रदर्शित केलेली आहे.

जगभरातील नामवंत क्रिकेटपटूंनी मैदानावर वापरलेले साहित्य संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत कसोटीत सर्वाधिक विकेट घेतल्या श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने. त्यावेळेस रेकॉर्ड करताना वापरलेली जर्सी येथे आहे. वेस्ट इंडिजचे फलंदाज सर विवियन रिचर्ड्स यांचा स्वेटर पाहायला मिळतो. माल्कम मार्शल, क्लाइव लॉईड, कपिल देव, अँलन डोनाल्ड, डिव्हिलियर्स, केविन पीटरसन, महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, रोहित शर्मा यांच्यासह अनेक खेळाडूंनी वापरलेले बॅट्स, जर्सी, ग्लोव्हस, पॅड्स, टोप्या असे साहित्य पहायला मिळते. ३००, ४०० व ५०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या स्वाक्षऱ्या चेंडूंवर पाहता येतात. ज्यात अनिल कुंबळे, रिचर्ड हेडली, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरनग्लेन मॅकग्राथमाल्कम मार्शल, कर्टली अँब्रोस, शॉन पोलॉक, वसीम अक्रम यांसारख्या महान गोलंदाजांच्या स्वाक्षऱ्या चेंडूंवर पहायला मिळतातब्रेट लीचा बॉलिंग करता करता फाटलेला बूट येथे दिसतो.

खेळाडूंच्या जर्सीज आणि बॅटस      Image Source - Internet

प्रख्यात गोलंदाजांनी स्वाक्षऱ्या केलेले चेंडू       Image Source - Internet

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे एक विशेष दालन इथे आहे. या दालनात सचिनने परिधान केलेले हेल्मेट, चेस्ट गार्ड, ग्लोव्हस, पॅड्स, एल्बोगार्ड, संपूर्ण पोशाख  सचिनची अनेक छायाचित्रे पहायला मिळतात. सचिनचा वाघा बॉर्डर वरचा एक दुर्मिळ फोटो येथे आहे. त्यात सचिनचा एक पाय भारतात व एक पाय पाकिस्तानात आहे. सचिनने केलेल्या १०० शतकांच्या छोट्या १०० बॅटस येथे लावल्या आहेत. सचिनने वापरलेली स्वाक्षरी केलेली एक बॅट आपल्याला हाताळता येते. त्या बॅटसोबत आपल्याला छायाचित्रही काढता येते. विविध देशांच्या अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या संग्रहालयाला भेट दिली आहे. दिवसेंदिवस इथला क्रिकेटविश्वातला मौल्यवान संग्रह वाढत आहे. असे क्रिकेटच्या अद्भुत दुनियेत हरवून टाकणारे  हे संग्रहालय कधीतरी तुम्ही वेळ काढून आवर्जून पहा.
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ - 
१) www.bladesofglory.net
-------------------------------------------------------------------------------
वेळ - १०.३० ते ७ (संग्रहालय पूर्ण आठवडा उघडे असते.)
पत्ता - गोविंद गौरव अपार्टमेंट (तिसरा मजला), स्वानंद सोसायटी लेन १, सहकार नगर नंबर २, पुणे ४११००९
फोन नंबर - ९८२२४५४५६७
तिकीट - १०० रुपये
-------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक

https://www.flipkart.com/navamage-dadlay-kay-history-important-places-pune-city/p/itm6d6af57cb232c

---------------------------------------------------------------------------------

2 comments: