महात्मा फुले वाडा , पुणे

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।


या कवितेतून महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - नोव्हेंबर २८ १८९०) यांनी शिक्षणाचे महत्व एकोणिसाव्या शतकात पटवून दिले. त्यांनी १ जानेवारी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी आपली पत्नी सावित्रीबाईंवर सोपविली. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या म. फुले यांनी शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांची मांडणी केली. म्हणूनच १ जानेवारी हा दिवस 'फुले दांपत्य सन्मान दिन' साजरा केला जातो.

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. अशा या थोर समाजसुधारकाचा वाडा पुण्यातील गंज पेठेत आहे. त्यांच्या वास्तव्यामुळे मुळे या पेठेस 'महात्मा फुले पेठ' असे नाव दिले गेले. या वाड्यामुळे पुण्याच्या ऐतिहासिक श्रीमंतीत भर पडली आहे. आज आपण या वाड्याबद्दल जाणून घेऊयात. 

महात्मा फुले
वाडयात शिरताना एक सुबक तुळशीवृंदावन लागते. २८ नोव्हेंबर १८९० रोजी म. फुले यांचे येथे निधन झाले. ''आपल्या शवास दहन करू नये, तर मिठात घालून पुरावे'' अशी त्यांची इच्छा. त्यासाठी त्यांनी शेवटच्या आजारपणात घरामागे खड्डाही खणून घेतला होता. तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांनी हे सर्व अमान्य केल. नाईलाजास्तव त्यांचे दहन करून ३० नोव्हेंबर १८९० रोजी सावित्रीबाईंनी त्यांच्या पवित्र अस्थी या वाडयात आणल्या. येथील तुळशीवृंदावन व तेथील पादुका ही महात्मा फुले यांची समाधी. त्या समाधीचे दर्शन घेऊन आपण वाडयात शिरतो.

हवेशीर खोल्या, ओसरी तसेच अंगणात एक रहाट असलेली विहीर आहे. ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी खुली केलेली ती हीच विहीर. वाडयात एकूण तीन दालने आहेत.

आतील एक दालन

विहीर


'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकया पुस्तकाचे मुखपृष्ठ

चित्रांतून जीवनपट
येथील स्मारक संग्रहालयात म. फुले यांचा जीवनपट चित्रकार वसंत आठवले यांनी रेखाटलेल्या चित्रांतून साकार केला आहे. त्यांचे शिक्षण, विवाह, स्त्रियांची शाळा, सभेत भाषण करताना असे अनेक प्रसंग माहितीसकट जाणून घेता येतात. शिवाय महात्मा फुले यांचे एका दालनात मोठे पूर्णाकृती तैलचित्र लावले आहे. म. जोतिबा फुले यांच्या सहकाऱ्यांची देखील चित्रे पाहायला मिळतात. विशेष बाब म्हणजे येथे आपल्याला म. फुले यांचे पितळी अक्षरात कोरलेले मृत्युपत्र बघायला मिळते. त्यांची 'शेतकऱ्याचा असूड', 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक', 'गुलामगिरी' इत्यादी अनेक पुस्तके गाजली तसेच त्यांनी 'तृतीय रत्‍न' हे नाटकही लिहिले. 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक' या पुस्तकाचे मुखपृष्ठ येथे पहायला मिळते. त्यावेळेस त्याची किंमत १२ आणे इतकी होती.

हा वाडा १९२२ मध्ये श्री. बाळा रखमाजी कोरे यांनी श्री. अर्जुन पाटील बोवा ह्यांच्याकडून रुपये १५०० च्या मोबदल्यात खरेदी केल्याची नोंद मिळते. १९२२ पासून या ठिकाणी 'श्री सावतामाळी फ्री बोर्डिंग' चालविले जात होते, पुढे १९६९ मध्ये त्याचे महात्मा फुले वसतिगृह असे नामकरण करण्यात आले. हा वाडा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहालये विभागातर्फे मूळ स्वरूपात जतन करण्यात येत आहे. समताभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रसिद्ध वाडयाच्या आवारात सावित्रीबाई फुले व महात्मा फुले या दोघांचे पुतळे बसविले आहेत. अशा या थोर समाजसुधारकाने जिथे निवास केला व अखेरचा श्वास घेतला, तो वाडा एकदा जरूर पहावा.


फुले वाडा
-------------------------------------------------------------------------------
पत्ता:- महात्मा फुले पेठ, पुणे, महाराष्ट्र ४११०४२ 
वेळ:- सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३०, सोमवारी व शासकीय सुट्टी दिवशी बंद
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ:-
१) पुण्यातील संग्रहालये - डॉ. मंदा खांडगे
२) सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्व - प्रा. ना. ग. पवार
-------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक

https://www.flipkart.com/navamage-dadlay-kay-history-important-places-pune-city/p/itm6d6af57cb232c

---------------------------------------------------------------------------------
© सुप्रसाद पुराणिक

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@suprasadp